मुंबई : “वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना असून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आहे. ते संपूर्ण जगाला जोडण्याचे काम करतात. ते सनातन धर्माचे आधारस्तंभ आहेत. वेदांमध्ये ज्ञान, विज्ञान, गणित, धर्म, वैद्यक आणि संगीतही भरपूर आहे.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्या चारही वेदांच्या हिंदी भाषेतील तिसऱ्या आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, वेदांच्या मंत्रांमध्ये अंकगणित, घन आणि घनमूळ ही तत्त्वेही स्पष्टपणे सांगितलेली आहेत. वेदांमध्ये संपूर्ण जगाच्या कल्याणाची चर्चा आहे. वेद जगातील सर्व मानवतेला एकतेचा मार्ग दाखवतात. सनातन संस्कृतीत जीवन जगण्यासाठी स्पर्धा करण्याची गरज नाही, हे वेदांनी आपल्याला शिकवले आहे.”
पुढे ते म्हणाले, “आपल्या ऋषीमुनींनी ही दृष्टी डोळ्यासमोर ठेवून जगाच्या कल्याणासाठी वेदांची रचना केली होती. आपल्या देशात मुलाचे पोट भरले की आई तृप्त होते. विज्ञान यावर विश्वास ठेवणार नाही पण हा भौतिकवादाच्या पलीकडचा आनंद आहे. वेदांचा आधार सर्व ज्ञान प्रणालींमध्ये दिसून येतो. वेदांच्या अभ्यासाने संपूर्ण मानवजातीचे ज्ञान होत राहील.”
कार्यक्रमात महामंडलेश्वर पू. स्वामी बालकानंद गिरीजी महाराज म्हणाले की, आक्रमणकर्त्यांनी वेद आणि सनातन गुरुकुल नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ते आपल्या ऋषीमुनींच्या आठवणीत लिहिलेले वेद नष्ट करू शकले नाहीत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत वेद शाश्वत आहेत आणि कायम राहतील.