वैद्यकीय पथकाने पाण्यातून नदी पार करत आदिवासी महिलेवर केले उपचार

तालुक्यातील सात्री येथील आदिवासी महिलेवर व तिच्या नवजात शिशुवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकाने जंगलात पायपीट करून कंबरेभर पाण्यातून नदी पार करत गाव गाठत महिलेवर उपचार केले. प्रशासनाने बोट न दिल्याने 26 सप्टेंबर रोजी चार जणांच्या वैद्यकीय पथकाने सात्री ग्रामस्थ वर्षानुवर्ष अनुभवत असलेल्या वेदना अनुभवल्या.

सात्री येथे नदीतून गाव पार करण्याची सवय गावकऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. ग्रामस्थांना पावसाळ्यात दरवर्षी नवनवीन संकटांना सामोरे जावे लागते. सामी सायमल पावरा (वय 28 ) ही आदिवासी पावरा समाजाची महिला पाचव्यांदा गर्भवती होती. नियमित तपासण्या आरोग्य सेविका, आशा सेविका करत होत्या. तिने मारवड आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल व्हावे म्हणून तिला आधी सांगण्यात आले. मात्र तिने नकार दिला. नदीला पूर तसेच बोटची सोय नसल्याने तिला जाता आले नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे बोट मागितली. मात्र रबरी बोट तयार करणारी यंत्रणा नव्हती म्हणून त्यांनी दोन दिवसात पूर उतरेल असे सांगत बोट देण्यास असमर्थता दाखवली.

26 रोजी गावातच आशासेविका मंगला बोरसे यांच्या मदतीने सामीची प्रसूती झाली. तिची चिंता वाढल्याने पोलीस पाटील विनोद बोरसे यांनी डॉ.गोसावी यांच्याशी संपर्क केला. मारवडचे वैद्यकीय अधिकारी डॉ निखिलपाटील, डांगरीचे समुदाय आरोग्याधिकारी डॉ शिवराज राऊत, आरोग्य सेवक दीपक पाटील, आरोग्य सेविका ललिता फिरके डांगरी गावाला बोरी नदी काठावर पोहचले. पोलीस पाटील विनोद बोरसे त्यांना घ्यायला जीव धोक्यात घालून पाण्यातून सात्रीहून डांगरी येथे आले. परिस्थिती पाहून वैद्यकीय पथक पाण्यात उतरायला तयार नव्हते. अखेर दीड ते दोन किमी जंगलात पायपीट करून सोयीच्या जागी थोड्या उथळ भागात सर्व जण पाण्यात उतरले. एकमेकांचे हात धर पुराच्या प्रवाहातून कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत सर्व जण सात्रीला पोहचले. सामीला इंजेक्शन देत सलाईन लावून तिच्या पोटात अडकलेल्या रक्ताच्या गाठी काढल्या. सामीला पाचवी मुलगी झाली होती. तपासण्या उपचार करून वैद्यकीय पथक पुन्हा बाजूला दोन किमी जंगलात चालून आणि एक किमी नदीत प्रवास करून माघारी आले. पोलीस पाटील विनोद बोरसे, सुनील बोरसे, प्रवीण पावरा, विजय भिल, कमलसिंग यांनी वैद्यकीय पथकालाआणून महिलेवर व बाळावर उपचार करून घेतले म्हणून त्यांचेही कौतुक होत आहे.