शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निरीक्षकांना अहवाल गोळा करण्याच्या सूचना ;’इतक्या’ जागांवर लढण्याची तयारी सुरु?

विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागतील अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ९० ते १०० जागांवर लढण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस जास्त जागा मागत असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे ठाकरे गट देखील अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही असल्याचं समजतं.

शरद पवार गट ९० ते १०० जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून १०० च्या जवळपास जागांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. क्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा आणि बूथ कमिट्या तयार करा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची झूम मीटिंग झाली होती. यामध्ये यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.