मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाने दाखल केलेल्यग याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी विधिमंडळाने आठ आमदारांना नोटीस बजावली. आतापर्यंत शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आली.अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. नवाब मलिकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनाही नोटीस बजावली नाही. अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षीरसागर या आमदारांना विधिमंडळाने नोटीस बजावली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि पक्षावर दावा करण्यात येऊ लागला. त्यानंतर आपल्याला अपात्र का करू नये, याबाबत अजित पवार गटाकडून याचिका करण्यात आली
अपात्रतेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचा आदेश दिला जावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासन ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. विजयादशमीनिमित्त न्यायालयाला एक आठवडा सुटी होती. सोमवारी न्यायालयातील कामकाज नियमित सुरू होणार आहे. न्यायालयाने 17 ऑक्टोबरच्या सुनावणीत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्रतेच्या मुद्यावर वेळापत्रक निश्चित करण्याचा आदेश देताना, ही शेवटची संधी असल्याचा इशारा दिला होता.