मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय आयोगाने यापूर्वी दिला असून, शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे पक्षनाव देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश देऊन, आठवडाभरात पक्षचिन्ह देण्यास सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे पक्षचिन्ह देण्यात आले. अजित पवार यांच्या गटाकडे ‘घड्याळ’ हे चिन्ह कायम राहिले आहे.
आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटले आहे की, “निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. हे चिन्ह देऊन आयोगाने आम्हाला लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत, असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. “तुतारी” हे चिन्ह आमच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ गटासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका’ असाच संदेश त्यांनी आम्हाला दिला आहे.