शहरवासीयांना दिलासा : 18 किलोमीटर कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव : जळगाव शहराची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जळगाव बायपासचे  मार्च 2024 पर्यंत काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील जळगाव बायपासच्या प्रगतीपथावरील कामांचा पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी परीविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा जळगाव तहसीलदार अर्पित चव्हाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जयश्री माळी, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार विजय बनसोडे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, शेळावे बॅरेजचे अधिकारीही उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव बायपासच्या कामांना गती देण्यात यावी. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदारांनी बायपासच्या भराव कामासाठी दीड लाख टन माती, मुरूम आवश्यक आहे. अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, शेळगाव बॅरेजमधून नियमानुसार रायल्टी भरून मुरूम, माती उपलब्ध करून घ्यावी. यासाठी महसूल व शेळगाव बॅरेज प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. महामार्गावर येणाऱ्या रेल्वे फाटक उड्डाणपुलाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.

बैठकीपूर्वी जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या तरसोद- पाळधीच्या बायपासच्या कामांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी पाहणी केली. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.बायपास महामार्गाचे कामात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महसूल विभागाने बायपासवरील शेत जमीनीचे विक्रमी वेळेत भूसंपादन केले आहे. यापुढे बायपासचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.