जळगाव : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडिया च्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रियस्तरावर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगांव सर्जिकल सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे शनिवारी दि. १५ जून रोजी सकाळी १० ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ३५ डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले आहे.
शासकीय रुग्णालयात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत असतो. या पार्श्वभूमीवर तसेच, जागतिक रक्तदाता दिनानिमित्त असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडिया च्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रियस्तरावर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुशंगाने जळगांव सर्जिकल सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने हे शिबीर रुग्णालयातील रक्तपेढीत घेण्यात आले. शिबिरात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे, जळगांव सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. स्नेहल फेगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला शिबिराचे समन्वयक सहयोगी प्रा. डॅा.रोहन पाटील यांनी प्रस्तावना करून कार्यक्रम आयोजनाविषयी माहिती दिली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी, समाजबांधवांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले. तर डॉ. दीपक पाटील यांनीहि मनोगत व्यक्त केले. प्रसंगी रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी विकृतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.भरत बोरोले, डॉ. कुणाल देवरे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. ईश्वरी भोंबे, डॉ. रोशन पाटील, डॉ. सुनील गुट्टे, डॉ. बिन्दूश्री राजेश आदींनी परिश्रम घेतले.