मुंबई: लोकसभा निवडणुका होईपर्यंत मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. याच संदर्भात शारदाश्रम महाविद्यालयाचे शिक्षकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. निवडणुका होईपर्यंत शाळाबाह्य काम करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते. त्यांच्या शाळेला नोटीस आली आहे. पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणूकीचं काम देण्यात आले आहे. किती काळ ड्युटी असेल माहीत नाही,मग शिकवणार कोण? 4 हजार 136 शिक्षकांना निवडणूकांच्या कामांसाठी बाहेर काढण्यात येत आहे. मगं निवडणूक आयोग पाच वर्षे काय काम करतं?” असा संपप्त त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान शारदाश्रम शाळेतील १२ शिक्षकांपैकी १० शिक्षकांना निवडणूकींची ड्युटी लावली आहे. उरलेल्या २ शिक्षकांपैकी १ शिक्षकांचा अपघात झाला आहे. त्यामुळे ऐन परिक्षेच्या कालावधीत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले, पाच वर्षे काय केलं तुम्ही? पाच वर्षात ही लोकं तुम्ही का शोधत नाही? जर वेळेत हजर झाले नाही तर शिक्षकांवर हक्कभंग आणणार आहेत. तर मग निवडणूक आयोगावर हक्कभंग का आणू नये? शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहेत. यावर आमची नेत्यांची बैठक होईल, उद्या परवा आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. तोपर्यंत कोणत्याही शिक्षकांनी रुजू होऊ नका, शिक्षकांवर कोण हक्कभंग आणतो तेच बघतो आम्ही,” असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.