ठाणे : नेहमीच हिंदु विरोधी वक्तव्ये करणारे इंडी आघाडीचे प्रवक्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा बरळले आहेत. ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाडांनी विशाळगडावर आंदोलन करणाऱ्या शिवभक्तांना चक्क चंबळचे दरोडेखोर संबोधले. याआधीही आव्हांडांनी असे अनेक प्रमाद केले आहेत. आता मुस्लिमांचे लांगुलचालन करताना थेट शिवभक्तां विरुद्ध त्यांची जीभ घसरल्याने शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पुण्यात रविवारी भाजपच्या अधिवेशनात भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांकडून शरद पवारांचे वाभाडे काढण्यात आल्याने जितेंद्र आव्हाडाना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. या तसेच अन्य मुद्यावर भाष्य करण्यासाठी आव्हाडांनी आपल्या ‘नाद’ बंगल्यावर सोमवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना आव्हाडांची जीभ घसरली.विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबत भाष्य करताना डॉ. जितेंद्र आव्हाड बरळले आहेत. स्थानिकांनी तहसीलदार, पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही.
त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला त्यानंतर गजापूरात पोलीस अधीक्षकांच्या समोर लूटमार केल्याचा आरोप आव्हाडानी केला. तर पुढे बोलताना कहर केला. विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही दर्ग्याशेजारी मुक्काम केला होता. तेव्हा, दर्ग्याला काही झाले नाही. अन् आता दंगली केल्या जात आहेत. गडावर दंगल करून खाली लुटपाट केली. हे कसले शिवभक्त ते तर चंबळचे दरोडेखोर आहेत. अशी मुक्ताफळे आव्हाडांनी उधळली. आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे शिवभक्तामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हिंदुविरोधी आव्हाडांची ही जूनीच रीत…
ठाण्यातील कळवा – मुंब्रा या मुस्लीमबहुल इलाख्याचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड राजकीय तसेच सामाजिक जीवनात नेहमीच हिंदू विरोधी भूमिका घेताना दिसतात. यापूर्वी आव्हाडांनी प्रभु श्रीराम मांसाहारी असल्याचे अकलेचे तारे तोडले होते. मध्यंतरी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात सिंधी समाजाला ‘कुत्रा’ संबोधले होते. हाथी चले बाजार … कुत्ते भौके हजार… और एक शेर को मारने के सौ सिंधी कुत्ते दौड रहे है । असे म्हटले होते. छत्रपती संभाजी राजांबाबतही आव्हाड असेच बरळले होते.शरद पवारांची साथ सोडुन राष्ट्रवादी (अजितदादा) गटाच्या वाटेवर असलेल्या सोनिया दुहान यांच्याबद्दल बोलतानाही आव्हाडांची जीभ घसरली होती. ती पकपक सोनिया दुहान काय इंदिरा गांधी आहे का ? अशी खालच्या पातळीवरची प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली होती.
जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र धिक्कार….
दोन वर्षांपूर्वी अनंत करमुसे या शिवभक्ताला घरात आणून बेदम मारहाण करणाऱ्या, महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आणि मनुस्मृतीचा विरोध करताना चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाहीरपणे फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना शिवभक्तांना दरोडेखोर म्हणण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे? महाराष्ट्रातील शिवभक्त या औरंग्याच्या अवलादीची राजकीय कबर महाराष्ट्रात बांधल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांना आपल्या मानसपुत्राचे हे वक्तव्य मान्य आहे काय? अशा प्रकारच्या बेताल वक्तव्याने आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाच अपमान केला आहे.