मुंबई : रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत रतन टाटांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज ठाकरे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे. रतन टाटांबद्दल विचार करताना ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब आहे.”
“रतन टाटांनीजवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली. हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं,” असे ते म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “रतन टाटांकडे जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून टाटा समूहाची धुरा आलीच. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि ‘लायसन्स राज’शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग म्हणजे ‘लायसन्स राज’ संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले.”
“भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली,” असेही ते म्हणाले.