तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। मोगल सरदार अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे येत्या १६ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आणण्यात येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.
या घटनेनंतर आदिलशाही चांगलीच हादरली होती. पुढील काळात ही वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली. आता भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. संग्रहालयाने या करारात काही अटी सुद्धा समाविष्ट केल्या आहेत. संबंधित वाघनखे कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत.
त्याचा विमा काढण्यात यावा, जेणेकरून चोरी होणार नाही आदींचा समावेश आहे. याशिवाय वाघनखांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना सुद्धा करारात समाविष्ट कराव्या लागणार आहेत. देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यात येणार असल्याचा सर्वांनाच आनंद आहे. राज्यात आणल्यानंतर ती सर्वांना पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल. ती ठेवण्यात येणार्या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग उभारण्यात येईल, असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रधान सचिव विकास खरगे, ऐतिहासिक संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे पुढील काही दिवसांत व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे.