जळगाव : शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणासह त्यांच्या आईला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील आसोदा रोडवर असलेल्या घरकुल चौकात मंगळवार, २९ रोजी सकाळी ९ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र भगवान सोनवणे (वय-३२) रा. वाल्मिक नगर, जळगाव हा तरूण आपल्या आई व परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राजेंद्र सोनवणे हा श्याम तुकाराम सुर्यवंशी रा. घरकुल चौक, वाल्मिक नगर याला शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेला होता.
त्यावेळी श्याम सुर्यवंशी याने राजेंद्र सोनवणे आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली त्यानंतर राजेंद्रला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी आसारी मारून दुखापत केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजेंद्र सोनवणे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी श्याम तुकाराम सुर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बोदवडे करीत आहे.