धुळे : तरूणाच्या लुटीच्या गुन्हयाचा देवपूर पोलिसांनी छडा लावला आहे. एकाला अटक केली असून तरूणाची हिसकावलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुन्हयातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
देवपूरातील बिलाडी रोडवरील एकता नगरात राहणारे योगेश सुकलाल निकम (वय ४३) हे दि.७ जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१८ ए.एम.३६७९) स्वामी नारायण मंदीर रोडवरील श्रीराम चौकाजवळुन घरी जात होते. त्यादरम्यान त्यांना मागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अडविले. कारण नसताना शिवीगाळ करुन गालावर चापट मारली. तसेच त्यांच्या खिशातील २ हजार रुपये रोख व एटीएम, पॅनकार्ड, आरसीबुक असे ठेवलेले पाकीट व त्यांची दुचाकी देखील जबरीने हिसकावुन पळुन गेले.
याप्रकरणी देवपूर पोलिसात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने गुन्हयाचा तपास सुरू केला. त्यादरम्यान हा गुन्हा अक्षय सुरेश चव्हाण (रा.दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपुर) याने त्याचा साथीदार अविनाश ऊर्फ गोल्या युवराज बोरसे याच्या मदतीने केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार शोध पथकाने अक्षय चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार गोल्या बोरसे याच्या सोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हयातील फिर्यादीची दुचाकी जप्त करण्यात आली. गुन्हयातील दुसरा आरोपी अविनाश बोरसे हा अद्याप फरार असुन त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.