शेअर बाजर : आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक राहिला . बाजारात गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रॉफिट बुकिंग झाल्याने बाजार दिवसाअखेर लाल रंगात बंद झाला. आयटी आणि बँकिंग समभागांच्या नेतृत्वाखाली बाजारात ही विक्री दिसून आली. BSE सेन्सेक्स 352 अंकांनी घसरून 72,790 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 91 अंकांनी घसरून 22,122 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात आयटी आणि बँकिंग शेअर्स मोठ्या घसरणीसह बंद झाले. निफ्टी आयटी निर्देशांक 447 अंकांनी तर बँकिंग निफ्टी निर्देशांक 235 अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय फार्मा, धातू, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्य सेवा क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागही घसरत बंद झाले. ऑटो, एनर्जी, इन्फ्रा आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीने बंद झाले.