शेअर बाजार : मंगळवारी भारतीय शेअर बाजार काहीश्या घसरणीसह उघडले. मात्र, नंतर त्यांच्यात वाढ झाली. मंगळवारी सकाळी BSE सेन्सेक्स 28.84 अंकांनी घसरून 73,473.80 अंकांवर तर NSE निफ्टी 2.85 अंकांनी घसरून 22,329.80 अंकांवर उघडला. नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. सकाळी ९.५५ पर्यंत सेन्सेक्स ३८५.३८ अंकांनी वधारून ७३,८८८.०२ अंकांवर पोहोचला होता. यासह निफ्टी 72.10 अंकांनी वाढला असून तो 22,404.75 अंकांवर पोहोचला आहे.
बँक निफ्टी आणि आयटी शेअर्स वधारले
मंगळवारी बँक निफ्टी आणि आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. बँक निफ्टी जवळपास 400 अंकांनी वर गेला आहे. एचडीएफसी बँकेचे शेअर्स सुमारे 31 रुपयांनी वाढून 1457 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इंडसइंड आणि ॲक्सिस बँकेतही प्रचंड वाढ झाली आहे.