शेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यात १७ केंद्रांवर होणार ज्वारी खरेदी

जळगाव : शासनाने रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचे परवानगी दिली आहे. यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश काढले आहेत. बाजारभावापेक्षा जादा भावाने ज्वारी खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शासनाने ज्वारीसाठी ३ हजार १८० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. बाजारात ज्वारी २००० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे. ८०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मका आणि हरभरा यांना बाजारभावापेक्षा कमी हमीभाव असल्याने वर्षभरात शासकीय खरेदीच झाली नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी याबाबत व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात या केंद्रांवर करता येईल नोंदणी
जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव रावेर, मुक्ताईनगर, जामनेर  येथील शेतकरी सहकारी संघांना, तर बोदवड सहकारी पर्चेस अँड सेल्स युनियन, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संस्था, फ्रुटसेल सोसायटी पाळधी, शेंदुर्णी सहकारी जिनिंग व प्रेसिंग, कोरपावली वि.का. सोसायटी, यावल या केंद्रांना जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी ज्वारी खरेदी नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.