शेतकऱ्यांनो जागे व्हा , जनावरांना टॅगिंग न केल्यास अनुदान बंद होणार ! पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

जनावरांना इअर टॅगिंग बंधनकारक करण्याचा पशुसंवर्धन विभागाने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवार (ता. १)पासून सुरू झाली आहे.

जनावरांना इअर टॅगिंग बंधनकारक करण्याचा पशुसंवर्धन विभागाने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवार (ता. १)पासून सुरू झाली आहे. टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदीमुळे जनावरांची खरेदी-विक्री व सर्वच प्रकरणातील शासकीय मदत, वाहतूक, बैलगाडा शर्यतीतील बैलांचा सहभागासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ३१ मार्चपर्यंत टॅगिंग बंधनकारक केले होते. त्याची मुदत वाढवून ३१ मेपर्यंत केली होती. विशेष म्हणजे टॅगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून मिळणाऱ्या सेवाही बंद होणार आहेत.

पशुधनातील संसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी, तसेच प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने हा भारत पशुधन प्रणालीवर शेतकऱ्यांनी जनावरांची नोंद आणि इअर टॅगिंग करणे आवश्यक आहे.

आपल्या जनावरांचा इअर टॅग काढू नये अथवा तोडू नये. जनावरांचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नव्याने खरेदी केली असेल, तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी. पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.

…तर वाहतूकदार, मालकांवर कारवाई

कोणत्याही प्रकारच्या जनावरांची टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार व जनावर मालकांवर कारवाई होणार आहे. जनावरांच्या विक्रीसाठी वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकाऱ्याचे आरोग्य व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत. बैलगाडा शर्यतीत बैलांना टॅगिंग असल्याशिवाय सहभाग घेता येणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे दाखले संबंधित शेतकऱ्याला मिळणार नाहीत.

भविष्यात येणाऱ्या पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीही नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय उपचार केले जाणार नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. इअर टॅगिंगच्या निर्णयामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध होणार आहे.

“राज्य शासनाच्या भारत पशुधन प्रणालीवर शेतकऱ्यांनी जनावरांची नोंद आणि इअर टॅगिंग करणे आवश्यक आहे. आपल्या जनावरांचा इअर टॅग काढू नये अथवा तोडू नये. जनावरांचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नव्याने खरेदी केली असेल, तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी. पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.”- डॉ. श्‍यामकांत पाटील, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग