मुंबई । सध्या राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत असला तरी उन्हाचा चटका काही कमी झाला नाहीय. असह्य करणारा उकाडा जाणवत असून यांनतर आता सर्वांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, दरवर्षी 22 मे पर्यंत मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होतो. मात्र यंदा दोन दिवस आधी म्हणजेच 19 मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मान्सून 31 मे च्या सुमारास केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे, मान्सून केरळमध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु होते. केरळमधून पुढील 4 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे
गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र, यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.