शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ४ जूनपर्यंत मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री, खान्देशात कधी पोहोचेल?

जळगाव । राज्यातील अनेक ठिकाणी अद्यापही सूर्य आग ओकत असून वाढत्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. या गर्मीतून, उकाड्यापासून कधी सुटका होऊन ,मान्सूनचा पाऊस कधी पडतोय, याची सर्वजण वाट बघत आहेत. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही लवकरच मान्सून दाखल होणार आहे. येत्या मंगळवारी ४ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली.

यंदा मान्सून वेळेआधी ३० मेलाच केरळात दाखल झाला. यांनतर तो महाराष्ट्रात कधी पोहोचेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. केरळात दाखल झाल्यानंतर मान्सून आधी कोकणात येतो. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजेच आठ ते दहा तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात ३ जून रोजी, तळ कोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर खान्देशात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पोहोचण्याची शक्यता आहे.

जळगावात ढगाळ वातावरण राहणार
दरम्यान,  आज रविवारपासून पुढील सात दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. हवामान अभ्यासकांनी ४ ते ६ जून या तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.तर जळगाव जिल्ह्यात १५ जूननंतर नियमित मान्सून येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.