शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बीचा हंगाम चांगला; ‘हे’ आहे कारण

जळगाव : गेल्या चार दिवसांत राज्यासह जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून, धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. एकूण तेरा मध्यम, तीन मोठ्या प्रकल्पात मिळून एकूण ८९.८९ टक्के जलसाठा जिल्ह्यात आहे. यामुळे खरिप हंगामातील कापूस व रब्बीचा हंगाम चांगला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे.

वाघूर धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने जळगाव शहर, जामनेर व तालुक्यातील पाणी टंचाई मिटल्यात जमा आहे. हतनूर धरणात ७५ टक्के साठा आहे. हतनूर परिसरातील तापी काठची गावे, रावेर, यावल, भुसावळ परिसरातील पाणी टंचाई मिटली आहे. गिरणा धरणात ५६ टक्के पाणी आहे. अजून पावसाची शक्यता आहे.

यामुळे गिरणा पट्ट्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे. खरिप हंगामातील जिरायती कापसाचे नुकसान झाले असले, तरी आहे त्या पिकांचे चांगले उत्पादन येणार आहे. सोबत रब्बी हंगाम चांगला येण्याची आशा निर्माण झाली आहे.

हतनूर ७४.९० ८०.२०
गिरणा ५५.३८ १००
वाघूर ९३.५७ ८९.६६
जिल्ह्यातील अंभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर मोर ९५.५८, अग्नावती ९.२८, हिवरा २३.७९, बहुळा ५०.८५, अंजनी ८२.७४, गुळ ८०.६६, भोकरबारी २१.७६, बोरी २८.३२, मन्याड ४०.२७ टक्के असा पाणीसाठा आहे.