पुणे । राज्यासह देशातील काही भागात सूर्य आग ओकत असून तीव्र उष्णतेने नागरिक होरपळुन निघत आहे. असह्य करणाऱ्या उकाड्यातून दिलासा मिळण्यासाठी लोक मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षेत असून अशातच हवामान खात्याने मान्सूनबाबत दिलासा देणारी बातमी दिली आहे. मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयएमडीने दिली असून येत पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे.
यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी वर्तवला. रेमल चक्रदीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाने वेगाने वाटचाल केली असून पुढील तीन ते चार दिवसात पाऊस केरळमध्ये दाखल होईल. देशात मान्सूनच्या महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होता. पावसावर अवलंबून असलेल्या कृषीक्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा 106 टक्क्यांनी अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. जूनमध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाईल. जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होईल. याचा परिणाम म्हणून जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात कधी दाखल होईल?
महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 10 ते 12 जूनला मुंबईत पावसाचं आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे.