शेळगाव बॅरेंजसह वाळूचा विषय… नक्की काय म्हणाले जिल्हाधिकारी?

जळगाव : जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शेळगाव बॅरेजसह वाळूचा विषय येत्या सहा महिन्यात मार्गी लागणार आहे. हतनूर धरणातील गाळ काढण्याबाबत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करण्यात आलेली असून राज्य व केंद्र शासनातर्फे ते सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिली.’तरुण भारत’ कार्यालयात स्थापन केलेल्या गणेशाची आरती आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी त्यांच्याशी ‘तरुण भारत लाईव्ह’ तर्फे संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

शेळगाव बॅरेजबाबत पाठपुरावा सुरू
शेळगाव बॅरेजबाबत पाठपुरावा सुरू काही कामे व भू-संपादनची कामे बाकी आहे. त्याबाबत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. हे काम येत्या सहा महिन्यात मार्गी लागून शेळगाव बॅरेज सुरू होईल. यामुळे या जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात हमखास वाढ होणार आहे.

सहा महिन्यात वाळूची स्थिती सुधारेल
जिह्यातील वाळूबाबत बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, वाळूबाबत नियोजन केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत वाहने जप्त करण्यासह दंडात्मक कारवाईही केली आहे. अवैध वाळू व्यावसायिकांसोबत बैठका घेतल्या असून त्यांना अधिकृतरित्या वाळूचा व्यवसाय करण्याबाबत सांगितले आहे. तसेच येथे लिलाव प्रक्रियाही झाली नाही. नेमके वाळूचे ठिकाणे शोधून त्याची लिलाव प्रक्रिया केली जाईल. येत्या सहा महिन्यात अवैध वाळूची स्थिती सुधारत सर्वांना अधिकृतरित्या पुरेशी वाळू मिळेल… त्यामुळे वाळूबाबत एक चांगला जिल्हा म्हणून ओळखल जाईल. यातून राज्य शासनास चांगला महसूल मिळेल, असा विश्वास आहे.

हतनूर धरणातील गाळ काढण्याबाबत पाठपुरावा
हतनूर धरणात अनेक वर्षापासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागतात. यामुळे धरण क्षेत्रात व धरणाच्या वरील क्षेत्रात पुरमय स्थिती निर्माण होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकत्याच आलेल्या पुरात असे नुकसान झाले. तेथे मी स्वतः भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. पूरग्रस्तांना किंवा बाधित गावांना पंचनामे करून मदत दिली जात आहे. हतनूर धरणातील हा गाळ काढण्यासाठी विशेष योजना राबविण्यात राज्य व केंद्र सरकारकडे मंत्री महोदयांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे. तर काही ठिकाणी भू-संपादनचे काम बाकी आहे त्याबाबतही राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले

पाळधी ते तरसोद बायपास
पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने जिल्ह्यात १८ मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. रस्ते, रेल्वे, सिंचन योजना यासारखे प्रकल्प सुरू • आहेत. काही ठिकाणी भू-संपादनाची कामे बाकी आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील वाद असल्याने किंवा कामगारांची उपलब्धता नसल्याने कामे रेंगाळत आहेत. काही वेळा निधीची कमतरता असते, तर काही ठिकाणी वनविभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय साधून कामे पुढे नेण्याचा प्रयत्न मी व माझे कार्यालय करत आहे. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांसोबत चर्चा झाली असून त्यांच्यामाध्यमातून राज्य व केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. या कामालाही गती येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

सण उत्साहाने साजरा करा
सध्या विविध सण आणि उत्सव सुरू आहेत. अशा काळात कोणीही धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करू नये. सर्वांनी सण उत्सव आनंदात व मोठ्या उत्साहात साजरे करावे. जर कोणी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्यावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गणेशोत्सवात सर्वत्र उत्साह असतो युवा वर्गानि यासाठी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा पसरविण्याचा प्रयत्न करू नये. या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असेही आयुष प्रसाद म्हणाले