डोंबिवली : राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष व पक्ष्यातील नेते आणि कार्यकर्ते तयारीला लागल्याचे दिसत आहे. याच तयारीत मनसे ने देखील मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बैठकी सुरु केल्या आहेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दोन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे शनिवारी कल्याण लोकसभेसंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. दरम्यान दिवा, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची भेट राज ठाकरे घेणार आहेत. यात कल्याण लोकसभेत उमेदवार द्यायाचा की नाही, याबाबत चर्चा होईल. मनसे आमदार राजू पाटील यांचे नाव कल्याण लोकसभेसाठी चर्चेत आहे.
कल्याणमधील बैठकीत नेते, शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष अशा मोजक्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कशी लढवायची, याच विषयावर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना प्रश्न केले. आपल्या विभागातील पदाधिकाऱ्यांची माहिती लवकर जमा करा, त्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि भिवंडी लोकसभेपेक्षा कल्याण लोकसभेवर राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येतंय. राज ठाकरे डोंबिवलीला येणार असल्याने डोंबिवली मनसे शहरच्या वतीने जागोजागी त्यांचे २० फुटी कटआऊट्स लावले आहेत. तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. सकाळी डोंबिवली शहारात भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक लढवावी, अशीच कार्यकर्त्यांची मते आहेत, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. या बैठकीत मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आमदार पाटील सहभागी झाले होते.