बारामती : अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी आहे, अशी घणाघाती टीका श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर तालुक्यातील काटेवाडीत बोलताना केली होती.
अजित पवारांवर श्रीनिवास पवारांनी टीका केल्यानंतर “सुज्ञ बारामतीकरांचे मत” या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात श्रीनिवास पवारांवर पत्राच्या माध्यमातून त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. याआधी बारामतीकरांची भूमिका या नावाने एक पत्र व्हायरल झालं होतं त्यानंतर सुज्ञ बारामतीकारांचे मत या नावाने पत्र व्हायरल होत आहे.
काय आहे पत्रात ?
सुज्ञ बारामतीकरांचे मत
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी – खोटा सहानुभूतीदार
श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला … पण हा शब्द वापरत असताना आपण सोईस्करपणे का विसरला आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी, समाजासाठी काय केले, एका बाजूला समाजा प्रति आपण काय तरी देणं लागतो, ह्याकडे डोळाझाक करून, दुसरीकडे मात्र केवळ अजित दादांचे छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचे काम केले.
वास्तविक पाहता कुठलीही व्यक्ती राजकारण, समाजकारण किंवा आपला व्यवसायामध्ये स्वकर्तुत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपला ठसा उमटावते, अजितदांदाकडे पाहिले तर ते सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आज अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात, जनतेमध्ये मिसळतात त्यांची कामे मार्गी लावतात, हे बारामतीकरांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनी वेळोवेळी दिली आहे.
बापू तुम्ही बोलताना म्हणाला की, मला पण पवार साहेबांसारखे काका मिळाले पाहिजे होते, पण तुम्ही हे विसरला की फक्त काका मिळून चालत नाही, तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात.
पण आज अचानक सपत्नीक पुढे येऊन अजितदादाच्या बद्दल जे मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलेला आहे, अशी शंका उपस्थित होते. कारण दादांच्या अनेक निर्णयाबरोबर आपण दादांच्या बरोबर दिसला होता.
बारामतीकर म्हणून असे वाटते की, तुम्ही एकतर अजितदादांना कायम व्हीलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाला असावे किंवा आपल्या बायको-पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्वकांक्षापोटी आपण हे पाऊल टाकले असावे.
शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की, आम्ही घोगडं भिजवत ठेवणाऱ्या खोटी सहाभूतीदार लोकांच्या मागे न उभा राहता प्रत्येक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत.
….आणि श्रीनिवासबापू आमचं ठरलंय “घड्याळ तेच वेळ नवी”