संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी धुळ्यात ‌‘सखी वन स्टॉप सेंटर’

धुळे : कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, ॲसिड हल्ले, सायबर क्राइम आणि बाल लैंगिक शोषणग्रस्त पिडीतांनी धुळे येथे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन धुळे सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र व्यवस्थापक ॲड. रोहिणी महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र शासनाने सखी वन स्टॉप सेंटर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केले आहे. धुळ्यात जिल्हा प्रशासकीय संकुल, जुने कलेक्टर ऑफिस आवारात जिल्हा कोषागार कार्यालयसमोर असलेल्या इमारतीत फेब्रुवारी, 2021 पासुन सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले असून या अडीच वर्षांच्या कालावधीत या सेंटरने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या मदतीने जानेवारी, 2021 ते नोव्हेंबर, 2023 या कालावधीत आजपर्यंत 440 पिडीत महिलांच्या विविध समस्यांवर निवारण करुन त्यांना विविध सेवा उपलब्ध करुन देत न्याय देण्याचे कार्य केले आहे.

यात 248 कौंटुबिक हिंसाचार, 14 लैगिंक अत्याचार, 9 बलात्कार, 9 अपहरण/मिसिंग, 1 बाल लैगिंक शोषण, 3 बालविवाह व इतर 156 अशा 440 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.
शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, ॲसिड हल्ला किंवा सायबर क्राईममधील कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. अशा वेळी सखी वन स्टॉप सेंटर पिडीतेच्या पाठीशी उभी राहुन लढा देत त्यांना न्याय मिळवुन देण्याचे काम करीत आहे.