नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुन्हा निवड झाली आहे. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात आयोजित करण्यात आली होती. तीन वर्षांनी संघात निवडणूक होत असते. त्यानुसार आजच्या अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुढील तीन वर्षांसाठी (२०२४-२०२७) पुन्हा एकमताने निवड करण्यात आली. यानंतर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी होसबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
दत्तात्रेय होसबळे यांचा जन्म १९५४ मध्ये कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील होसबळे गावात झाला. बंगळुरू विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दत्तात्रेय होसबळे वयाच्या १३ व्या वर्षी संघाचे स्वयंसेवक झाले. १९७२ मध्ये अ. भा. विद्यार्थी परिषदेत ते कार्यरत होते. १९७८ मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर ते संघाचे प्रचारक बनले. विद्यार्थी परिषदेत प्रांतीय, प्रादेशिक आणि अखिल भारतीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर,१९९२ ते २००३ अशी ११ वर्षे अ. भा. संघटनेचे मंत्री होते. २००३ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख बनले.
२००९ ते २०२१ या कालावधीत सहसरकार्यवाह पदावर कार्यरत होते. २०२१ पासून ते संघाच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दत्तात्रेय होसबळे यांची मातृभाषा कन्नड असून इंग्रजी, तामिळ, मराठी, हिंदी व संस्कृतसह अनेक भाषांचे त्यांना ज्ञान आहे. ते असिमा या कन्नड मासिकाचे संस्थापक संपादकही होते. १९७५-७७ च्या आणिबाणीच्या काळात त्यांनी चळवळीत सक्रिय भूमिका बजावली आणि सुमारे १४ महिने ‘मिसा’ अंतर्गत तुरुंगात राहिले. ते भारतात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संघटना विश्व विद्यार्थी युवा संघटनेचे संस्थापक सरचिटणीस होते. अमेरिका, युरोपसह जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.