भोपाळ : मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’ विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक अशी दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, राऊत यांच्या विधानाचा उद्देश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची प्रतिमा डागाळणे आणि महिला लाभार्थ्यांच्या भावना दुखावण्याचा आहे. शिवसेना उबाठा खासदाराने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या आणि चुकीच्या माहितीद्वारे असंतोष निर्माण करण्याचा कट म्हणून हे दिशाभूल करणारे विधान केले असल्याचाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
भाजपनेत्या पुढे असेही म्हणाल्या की, “राज्यातील भाजप सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा १ हजार, २५० रुपये दिले जात आहेत. भाजप सरकार भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी भाजप सरकार महिलांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे. संजय राऊत यांनी असे वक्तव्य करणे अत्यंत लज्जास्पद आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचलत का? : खासदार प्रियंका चतुर्वेदींचं राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य!
भोपाळ गुन्हे शाखेचे अतिरिक्त उपायुक्त शैलेंद्र सिंह चौहान म्हणाले की, “काही नेते सरकारच्या धोरणांबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. यासंदर्भातील तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे. आम्ही या तक्रारीवरून संजय राऊतांविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५३(२)’ आणि ‘३५६ (२)’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मध्य प्रदेशात येऊन बघावे
मध्य प्रदेशात ‘लाडली बहना योजना’ यशस्वीपणे सुरू असून दरमहा १.२९ कोटी भगिनींना त्याच्या हक्काची रक्कम प्राप्त होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी मध्य प्रदेशात येऊन ते बघावे. महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजने’मुळे भाजपला सत्ता प्राप्त होईल. त्यामुळे पराभवाच्या भीतीने घाबरलेल्या उबाठा नेत्यांकडून अशी विधाने येत आहेत, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केली आहे.