मुंबई : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात एका महिलेने ईडीला पत्र लिहिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार डॉ. स्वप्ना पाटकर यांना त्याचा जबाब बदलण्यासाठी सतत बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
स्वप्ना पाटकर यांनी २८ ऑगस्ट रोजी ईडीला हे पत्र लिहिले आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या तपासादरम्यान दिलेला जबाब बदलण्यासाठी आपल्याला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
स्वप्ना पाटकर आपल्या पत्रात म्हणाल्या की, “मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की, या प्रकरणातील आरोपी आणि त्याचे दलाल गुंड हे साक्षीदाराला सतत धमकावत आहेत. मला सतत धमक्या दिल्या जात आहेत आणि जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तपासादरम्यान दिलेल्या माझ्या जबाबानुसार, आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर काही जमिनी आणि मालमत्तेसाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे,” असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.