संतुलन ढासळले!

बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, मराठा, ओबीसी आरक्षण, अंगणवाडी सेविकांना न्याय, उद्योग का पळून गेलेत असे एक नव्हे तर अनेक विषय आज अचानक डोक्यात शिरलेत तीनही साहेबांच्या… यातले महानायक म्हणतात, गद्दारांनी सरकार पाडलं नसतं, तर अंगणवाडी सेविकांना न्याय दिला असता. दुसरे सहनायक म्हणतात, महाराष्ट्रात येणारे प्रकल्प अन्य राज्यात हलवले; त्याचे प्रायश्चित्त घ्या आणि तिसरे नटसम्राट म्हणतात, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई यांसारख्या विषयांवर राज्यकर्त्यांकडे धर्म हा एकमेव उतारा आहे. धर्माच्या नावावर कोणताही देश उभा राहू शकत नाही. मुळात काय तर सत्ता गेली, पक्ष गेले, चिन्ह गेले, नेते गेले, उपनेते गेले, उरलीसुरली अब्रू मान्यताप्राप्त पक्षांच्या नेत्यांना श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला न बोलावल्याचे सांगून निघाली. खरं म्हणजे एकामागून एक मिळालेल्या धक्क्यांमुळे महानायकांसोबत सहकलाकारांचेदेखील संतुलन ढासळल्याचे चित्र अलिकडल्या काळातील वक्तव्यातून दिसून येत आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन उभारले आहे. मुख्यमंत्री असताना, राज्यावर मोठमोठी संकट आणि आपत्ती आली होती. पण साहेब जागचे हलले असेल तर शप्पथ! सगळी संकटं त्यांनी घरूनच परतवून लावली. यावेळी मात्र ते आवर्जून बाहेर पडले. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात दिसले. नागपूरला जुन्या पेन्शनच्या मागणीसंदर्भातल्या मोर्चात सहभागी झाल्याचे दिसले. धारावी पुनर्विकास विरोधातील मोर्चात सरसावताना ते दृष्टीस पडले. मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मोर्चात ते आवर्जून सहभागी झालेले दिसले. एकेकाळी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी 50 हजार देण्याचे आणि शेतकरी ‘कर्जमाफी’ नव्हे, तर ‘कर्जमुक्ती’ करण्याची घोषणा करतानादेखील साहेब दिसले होते. सरकार पडल्यावर अलिकडेच परत साहेब शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नटसम्राटचा प्रयोग करताना दिसले होते. आता यावेळी साहेबांनी आपल्या एकपात्री प्रयोगाचं आयोजन अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनस्थळी केलेलं दिसलं. त्यांच्या एकपात्री प्रयोगातील संवादातील विचारलहरी ऐकून मन कसं गदगदून गेलं. त्यांनी सांगितलं, गद्दारांनी सरकार पाडलं नसतं, तर अंगणवाडी सेविकांना न्याय दिला असता. ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ या म्हणीप्रमाणे कल्पनारम्य आश्वासनं देऊन प्रलोभन दाखवणं अशातला हा प्रकार आहे. अंगणवाडी सेविकांचे आंदोलन हे आज होत आहे, अशातला भाग नाही. सरकार कुठलेही असो, अंगणवाडी सेविका गेली वर्षोनुवर्षे सातत्याने आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत.

साहेबांना आपलं सरकार आता पडत असल्याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा, अल्पमतातल्या सरकारने मुळात कुठलाही निर्णय घेणं अपेक्षित नसताना, औचित्य भंग करून मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याचे निर्णय घेतले. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या वडिलांच्या नावाचे हळद संशोधन, प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासंदर्भातला निर्णय तातडीने, घाईघाईने घेता आला. मात्र, यावेळी ज्याप्रमाणे वडिलांची आठवण झाली पुत्राला, तशीच आठवण या भावाला बहिणींची झाली नाही. शेतकरी, अंगणवाडी सेविका, माथाडी कामगार, सरकारी कर्मचारी यांना आठवले नाहीत. आज बरा पुळका आला अंगणवाडी सेविकांचा… नेता म्हणून नाही तर, भाऊ म्हणून आलोय्… ‘वा रे भाऊ…!’ देण्याची संधी होती, तेव्हा बहिणींना विसरणारा स्वार्थी आणि अप्पलपोट्या भाऊ हा बहिणींनी आज बघितला असेल. हा भाऊ गावभर आज माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, असं रडगाणं सांगून सहानुभूती मिळविण्यासाठी दर-दर भटकत आहे. परिस्थितीने कावराबावरा झालेल्या या भावाला, या नेत्याला, या गटप्रमुखाला आता वैचारिक अधिष्ठान राहिलेलं दिसत नाही. कारण, रामाचे अस्तित्व नाकारणारी काँग्रेस आणि या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा हिंदू धर्माबद्दल अपशब्द काढत असताना, काँग्रेसची आत्मा हिंदूच असल्याचं वक्तव्य करणे आणि त्याला महात्मा गांधींच्या ‘हे राम’ शब्दाचे उदाहरण देणे, हिंदुत्वाचा ठेका आपणच घेतला आहे असे समजण्याचे कारण नाही.

अयोध्येत राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने झाले. असा दावा करणार्‍या साहेबांनी आधी आपल्या पत्नीनं घरच्या वृत्तपत्रात काय भूमिका मांडलीय् ते बघावे. अदानी प्रकरणी सत्य कोसळे, सत्य जिंकले नाही बलवानांच्या पायाशी कोसळले. सत्याचे अधिष्ठान डळमळीत झाले, न्यायाचे वस्त्रहरण झाले, केंद्र सरकार एका उद्योगपतीसाठी झिजते आहे… वगैरे वगैरे सारखा भला मोठा डांगोरा पिटलाय् आपल्या श्रीमतींनी. या अग्रलेखातील मजकुरातून अदानींसाठी केंद्र सरकारने न्यायालयाकडून तसा निर्णय करवून घेतल्याचा सूचक इशाराच दिलाय्… जिथे अदानीसाठी केंद्र सरकार झिजू शकते तिथे राम मंदिरासाठी झिजणार नाही… या आपल्या कल्पानाशक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मुळात भाजपाला राम मंदिराचं श्रेय भेटत आहे, हे बघून आपल्याला अजीर्ण होणे स्वाभाविक आहे. आपल्या सोयीने न्यायालयाची भूमिका बदलून सांगण्याचा, दोन्ही ढोलकीवर थाप मारण्याचा हा आटापिटा फार काळ चालण्यासारखा नाही. वैचारिक अधिष्ठान घालवून, वाट्टेल ते बरळले तर केवळ टाळ्या मिळतील. मतं मात्र मिळत नाहीत, हे मागील काळातील निवडणुकीच्या निकालातून यांच्या पक्षाची झालेली दयनीय अवस्था बोलकी आहे. साहेब…! आता आपल्याला गद्दारांना धडा शिकवायचा आहे, दिल्लीचं तख्त झुकवायचं आहे, शिवशाही आणायची आहे, त्यामुळे संतुलन ढासळू देऊ नका.

9270333886
– नागेश दाचेवार