---Advertisement---
Ramdev Wadi Accident Case : रामदेववाडी अपघात प्रकरणातील तीन संशयितांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. ३) फेटाळला. त्यामुळे संशयितांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
रामदेववाडी येथे ७ मेस सुसाट ईको स्पोर्ट्स कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात वच्छला सरदार चव्हाण (वय २७), मुलगा सोहम (८), सोमेश (२) आणि भाचा लक्ष्मण नाईक (१७) या चौघांचा मृत्यू झाला होता. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी १७ दिवसांनंतर अर्णव अभिषेक कौल (वय १९, रा. जयनगर), अखिलेश संजय पवार (१९), ध्रुव नीलेश सोनवणे यांना अटक केली. पोलिस कोठडी संपल्यावर तिघांची कारागृहात रवानगी झाली आहे. तिघांतर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात जमीन अर्ज दाखल झाला होता.
न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर त्या अर्जावर सुनावणी सुरू होती. तिन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण होऊन न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायायाने रॅश ड्राईव्हिंग, अंमली पदार्थाचे सेवन यांसह संशयितांची राजकीय पार्श्वभूमी आणि आर्थिक सुब्बत्ता पाहता पुरावे आणि साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जामीन अर्ज फेटाळल्याच्या कारणामध्ये स्पष्ट केले आहे.
सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी, संशयित अर्णव कौलतर्फे ॲड. प्रकाश बी. पाटील व ॲड. अकील इस्माईल, अखिलेश पवार याच्यातर्फे ॲड. सागर चित्रे, तर फिर्यादीतर्फे ॲड. हरुल देवरे यांनी काम पाहिले.