संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

नवी दिल्ली:  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. ९ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे विद्यमान लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे मोदी सरकारला आपला नियमित अर्थसंकल्प यावेळी सादर करता येणार नाही. त्यामुळे जून महिन्यापर्यंतचा सरकार खर्च चालविण्यासाठी सरकार अंतिरम अर्थसंकल्प सादर करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाचा प्रारंभ होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. निवडणुकीच्या आधी शेवटचे अधिवेशन असल्या मुळे सरकार आपल्या अंतरिम अर्थसंकल्पातून युवा, महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी कार्यक्रमांची घोषणा करू शकते. यावेळी पीएम सन्मान किसान निधीत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.