जळगाव : शेत शिवारात चरण्यासाठी नेत असताना महावितरणच्या विद्युत डिपीजवळ विजेच्या धक्क्यात तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. रविवार 12 रोजी सकाळी 9 वाजता (रा.कुसुंबा, ता.जळगाव) येथील शेत शिवारात ही घटना घडली. ही वार्ता कळाल्यानंतर शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना जबर धक्का बसून असून दुभती जनावरे एकाच वेळी गेल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला. रवींद्र गुलाब पाटील (41) या शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुभती जनावरे पाळली आहेत. या दुर्घटनेत रवींद्र पाटील यांचे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घटना कळतात ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दूधाची आवक सुरू ठेवण्यासाठी दुधती गुरे नेहमी पाळावी लागतात. त्यानुसार पाटील यांनी दुधत्या म्हशी पाळल्या होत्या. नेहमीप्रमाणे रविवारी त्यांच्या मालकीच्या म्हशीना शेत शिवारात चरण्यासाठी नेत होते. रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या रोहित्रास ओलांडत असताना म्हशीना वीजेचा तिव्र धक्का बसून एका पाठोपाठ एक अशा तिनही म्हशी जागेवर कोसळून त्या गतप्राण झाल्या. डोळ्यादेखल तीन म्हशीचा हातातून गेल्याच्या घटनेने शेतकरी जागेवरच शोकमग्न झाले.
कुसुंबा येथील पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी शिवारात घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील चौधरी यांनी पोलिसांना खबर दिली. एमआयडीसी पोलिसानी घटनास्थळी पंचनामा केला. जेसीबीच्या मदतीने म्हशींचे मृतदेह दफन करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली.महावितरण कंपनीच्या सदोष कार्यपध्दतीमुळे रवींद्र पाटील यांची दुभत्या म्हशी दगावल्याचा आरोप करत रवींद्र पाटील यांना महावितरणाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.