नाशिक : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन कोकण, औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदारंसघ आणि नाशिक आणि अमरावती दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पाच मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदारसंघाबद्दल झाली. काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी मुलगा सत्यजीत तांबे यांच्या साठी माघार घेतली. यामुळं काँग्रेसनं सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. नाशिकची जागा काँग्रेसनं शिवसेनेसाठी सोडली. महाविकास आघाडीनं नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता.शुभांगी पाटील यांच्या उमदेवारीमुळं मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. अखेर सत्यजीत तांबे यांनी शुभांगी पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. सत्यजीत तांबे यांनी ६८९९९ मतं मिळाली. शुभांगी पाटील यांना ३९५३४ मिळाली तर १२९९७ मतं बाद झाली आहेत. पाचव्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना २९४६५ मतांनी विजय मिळाला.