समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात; १२ जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. अशातच समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला असून नाशिक निफाडकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सैलानी बाबांचे दर्शन घेऊन नाशिक निफाडकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. हि घटना रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान जांबरगाव टोल नाका येथे झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर वैजापूर व छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

घडललेया घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे कि छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. २० जखमींपैकी १४ जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत.

६ जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.