सरकारी कर्मचाऱ्यांना आज मिळू शकते मोठी भेट, मंत्रिमंडळ बैठकीत वाढणार महागाई भत्ता!

मुंबई:  आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट मिळू शकते. केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते आणि त्यानंतर त्यांचा भत्ता 50 टक्के होईल. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DA आणि DR) दोन्ही वाढवल्यास, यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 12,857 कोटी रुपये खर्च होतील. सुमारे 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे.

सध्याच्या केंद्र सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक
केंद्रातील विद्यमान मोदी सरकारची ही कदाचित शेवटची मंत्रिमंडळ बैठक असू शकते कारण पुढील आठवड्यात निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागू होणार असून, त्यानंतर केंद्र सरकारला हा निर्णय घेणे शक्य होणार नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांचा DA गेल्या वेळी कधी वाढला होता?
गेल्या वर्षी 18 जुलै रोजी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांनी वाढवला होता. सरकारच्या या निर्णयाचा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला. आज जर महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला तर सरकारी कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळेल.