सरकार महिन्याला देणार 10 हजार रुपये, ‘योजनादूत’ उपक्रम काय आहे ? ‘योजनादूत’ साठी अर्ज कुठे करावा ?

महाराष्ट्र सरकारनं राज्यात ‘मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना’ राबवण्यास मान्यता दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची प्रचार-प्रसिद्धी करणं आणि त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील 50 हजार तरुणांना योजनादूत म्हणून काम करण्याची संधी आहे. या उपक्रमाअंतर्गत सरकारतर्फे प्रतिमहिना 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे मानधन सहा महिन्यांसाठी असेल. याच उपक्रमात तुम्हाला भाग घ्यायचा असेल, सरकारचा योजनादूत व्हायचे असेल तर त्यासाठी अर्ज कुठे करावा? कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे? योजनादूत होण्यासाठीच्या अटी काय आहेत? हे जाणून घेऊ या…

कसा असेल उपक्रम ?
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत नेमण्यात येईल. एकूण 50 हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समाविष्ट)
योजनादूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही.
याचा अर्थ 6 महिन्यांनंतर योजनादूताचं काम संपुष्टात येईल.

योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष
वयोमर्यादा 18 ते 35
शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
संगणकाचं ज्ञान आवश्यक.
उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असावा.
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
उमेदवाराचं आधार कार्ड असावं व त्याच्या नावाचं बँक खातं आधार संलग्न असावं.

योजनादूतासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
विहित नमुन्यातील ‘मुख्यमंत्री योजनादूत’ कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
आधारकार्ड.
पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
वैयक्तिक बँक खात्याचा तपशील.
पासपोर्ट साईज फोटो.
हमीपत्र.

अर्ज कुठे करावा?
योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला http://mahayojanadoot.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे.