सर्व मंगल मांगल्ये शिवे ।

सर्वांना मंगलकारी ठरणारी, शिवाची अर्धांगिनी, सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी, इच्छापूर्ती देवीच्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे.देवींसोबत तिच्या गुणांचे महत्त्व सांगणारा सण म्हणजे नवरात्र. नवरात्रीला देवीच्या नऊ रूपांचे, गुणांचे स्मरण व पूजन करतात. देवीच्या या नवरूपांना आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवीचे हे नवरूप मनुष्याच्या जीवनात गुणांच्या रूपाने वावरत असतात. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

या चराचरात, सर्व प्राणिमात्रात ही देवी माता बुद्धी रूपाने, लज्जा रूपाने, शक्ती रूपेने, छाया रूपेने, शांती रूपाने, निद्रा रूपाने, क्षमा रूपेने सदैव वावरत असते. ही देवी आपल्यात सद्गुणांद्वारे वास करीत असते. तिचे प्रत्येक रूप आपल्याला काही ना काही शिकवते. आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरते. दुर्गुणावर, राक्षसी वृत्तीवर आपण सत्याच्या मार्गाने विजय मिळवू शकतो, हे आपल्याला देवीचे नवरूप शिकवतात. सद्गुणांचे प्रतीक म्हणजे दुर्गेचे नवरूप होय. असाध्य गोष्ट प्रयत्न करून, शिस्त पाळून, सत्याचा मार्ग धरून कशी साध्य केली जाऊ शकते, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे देवीचे नवरूप होय.मनुष्य जीवनाच्या जडणघडणीसाठी विकासासाठी प्रगतीसाठी अतिशय मार्गदर्शक व उपयुक्त सद्गुण देवीच्या रूपाने आपल्याला बघावयास मिळतात. मग ती प्रगती भौतिक असो की आध्यात्मिक !

शैलपुत्री : देवीचे पहिले रूप आहे शैलपुत्री. देवी पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. हिमालयाची पुत्री म्हणजे शैलपुत्री. तिला हेमवती व पार्वती असेही म्हणतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्वप्रथम मनुष्याला पर्वतासारखे दृढ, स्थिर, निश्चय व खंबीर असणे गरजेचे आहे. दृढ निश्चय आणि खंबीरता हेच ध्येयाच्या सफलतेचे निर्माते आहे.

ब्रह्मचारिणी : भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी देवी पार्वतीने कठोर तपाचरण केले होते. ६४ वर्षे जंगलात केवळ उपासतापास करून राहिली होती. ती तपस्विनी झाली म्हणून तिला ब्रह्मचारिणी हे नाव पडले. याचाच अर्थ आपल्याला आपले ध्येय साध्य करायचे असेल तर सतत प्रयत्न करणे, सुखसोयींचा त्याग करणे व ध्येय साध्य होईस्तव चिरंतन कार्य करणे आवश्यक आहे.

चंद्रघंटा : देवीच्या मस्तकावर चंद्राच्या आकाराची घंटा आहे म्हणून तिचं नाव चंद्रघंटा.‘मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।’ म्हणजे आधी मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. संताप, चिडचिड करून कुठलेही कार्य साध्य होत नाही.

कूष्मांडा : हे देवीचे चौथे रूप आहे. सृष्टीच्या सुरुवातीला अंधार होता; तो मिटवून देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली, असे म्हणतात. ती खूप तेजस्वी होती. सर्व प्राणिमात्रात स्थिर आहे.  तिला उघड म्हणजे कोहळा प्रिय म्हणून तिला कोहळ्याचा बळी देतात. आपल्या जीवनात अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होऊन प्रगतीसाठी ज्ञानाची, तेजाची, प्रकाशाची गरज आहे. त्यासाठी आणखी एक आवश्यक गोष्ट म्हणजे अहंपणा, गर्व, अहंकाररूपी कोहळ्याचा बळी देणे गरजेचे आहे. तरच यशाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होतो.

स्कंदमाता : देवीचे पाचवे रूप म्हणजे स्कंदमाता. स्कंद हे कार्तिकेयचे नाव. त्याची माता पार्वती म्हणून तिला स्कंद माता म्हणतात. या रूपात पार्वतीने बाळ कार्तिकेयाला आपल्या मांडीवर घेतले आहे. देवीचे हे रूप आपल्याला शिकवते की, बाहेर कितीही प्रगती केली तरी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये. कुटुंब हाच माणसाच्या जीवनाचा आधार आहे. पाया आहे. म्हणूनच जीवनात प्रगती करताना कुटुंबालाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही कुटुंबाला वेळ देणे आवश्यक आहे. ही देवी कुटुंबवत्सलचे प्रतीक आहे.

कात्यायनी : तात्या नावाच्या ऋषीची इच्छा होती की, देवीने त्याच्या पोटी जन्म घ्यावा. यासाठी त्यांनी घोर तपस्या केली. देवांच्या अंशाने निर्माण झालेल्या देवीचे सर्वप्रथम ऋषींनी पूजन केले व पुढे याच देवीने त्यांच्या पोटी जन्म घेतला. आज मुलाबरोबर मुलीचाही जन्म उत्सव आनंदाने साजरा करायला हवा. कारण स्त्री जननी आहे. बहीण आहे. पत्नी आहे. मुलगी आहे. सर्व रूपात तिचा सन्मान करण्याची गरज आज समाजाला आहे. स्त्रीशिवाय कुटुंब समाज आणि मनुष्य जात अपूर्ण आहे.

कालरात्री : नवरात्रीतील देवीचे हे सातवे व भयंकर रूप. तिचे नाव कालरात्री. तीन नेत्र असणारी, जिच्या नाकात, तोंडातून अग्नीच्या ज्वाला बाहेर येतात; अशी भयंकर रूप असणारी देवी म्हणजे कालरात्री. भयंकर रूपाइतकीच ती शुभ फलदायिनी आहे. म्हणून तिला शुभांतीदेखील म्हणतात. आयुष्यात कितीही कष्ट, यातना, कठोर तपस्या, दुःखाचे भोग आले तरी परिस्थितीत डगमगून न जाता सकारात्मक विचार केला तर ही परिस्थिती तुम्हाला खूप काही शिकवून जाते. जी पुढील आयुष्यात तुम्हाला अतिशय मार्गदर्शक आणि फायदेशीर ठरते. म्हणजे दुःख भोगूनही शेवटी त्याचा अंत शुभ-सुखदच होतो.

महागौरी : भगवान शंकराची कठोर तपस्या केल्यावर शंकर प्रसन्न झाले, परंतु एवढ्या कठोर तपस्येने पार्वती काळीठिक्कर पडली. म्हणून भगवान शंकरांनी गंगा जलाने तिला आंघोळ घालून स्वच्छ गोरी केली.पार्वती गोरी म्हणजे गौरी झाली; तीच महागौरी. म्हणजेच कष्ट, श्रम, अनुभवाने, परिस्थितीने माणसाचे मन धुवून स्वच्छ निर्मळ होते. लोखंडाचे सोने होते. मनाच्या स्वच्छतेबरोबर शरीराची स्वच्छता तितकीच गरजेची आहे. त्याचे शरीर निरोगी राहील. शरीर आणि मन निरोगी असेल तर ध्येय साध्य करताना तब्येतीच्या अडचणी येणार नाहीत. तुमचं कार्य निर्विघ्न पुढे सुरू राहील.

सिद्धीरात्री : देवीचे हे रूप सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. सर्व कष्ट-प्रयत्न, धैर्य-चिकाटी, अपरंपार मेहनत केल्यानंतर माणसाला जगातली कुठलीही सिद्धी प्राप्त होते. त्याचे ध्येय कितीही कठोर अशक्य असले, तरी साध्य होतेच. याच गुणांचा नऊ देवीच्या रूपाने जागर करण्याचा सण म्हणजे नवरात्र. देवीच्या या सद्गुणांची जर आपण जोपासना केली तर मनुष्याच्या आयुष्यातला विकास झाल्याशिवाय राहणार नाही.

७३५०८२३७४२
हेमांगी पराग देशपांडे