सहा लाख नागरिकांना 9 महिन्यात घरबसल्या मिळाले डिजिटल दाखले

जळगाव ः नागरिकांना आवश्यक असलेले विविध दाखले, कागदपत्रांचे सेतू सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले. जिल्ह्यातील 1209 सेतू केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मागील 9 महिन्यात 5 लाख 81 हजार 903 दाखल्यांचे ऑनलाईन वितरण केले आहे.  डिजिटल पध्दतीने हे दाखले महसूल प्रशासनाने नागरिकांना थेट घरबसल्या दाखल्यांचे वितरण केले.

यात जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलियर प्रमाणपत्र, वय आदी दाखल्याचे नागरिकांना घरबसल्या वितरण केले. 1 एप्रिल 2023 ते 3 जानेवारी 2024 या कालावधीत जात प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रांसाठी 6 लाख 12 हजार 537 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 5 लाख 81 हजार 903 जणांना विविध कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

मागील नऊ महिन्यात दररोजचे सरासरी 2 हजार 155 प्रमाणपत्रांचे जिल्ह्यातून वितरीत होत आहे. यात सर्वाधिक 2 लाख 95 हजार 578 उत्पन्न दाखल्याचे वितरण झाले आहे. त्याखालोखाल सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र 1 लाख 89 हजार 629 , वय-राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र 54 हजार 481, नॉन क्रीमीलीयर प्रमाणपत्र 38 हजार 649, रहिवास दाखला 2 हजार 8, ऐपत प्रमाणपत्र 706, शेतकरी दाखला 673, अल्पभूधारक दाखला 91, भूमिहीन प्रमाणपत्र 36, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र 36, तहसील कार्यालयाचे सर्टीफाईड प्रमाणपत्र 14, डोंगरी प्रमाणपत्र 2 जणांना वाटप करण्यात आले आहेत.

सहा वर्षात 4 लाख जात प्रमाणपत्रांचे वाटप

महसूल प्रशासनाच्या उपवभािगीय अधिकारी यांच्या माध्यमातून 2018-19 या आर्थिक वर्षापासून ते 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत 4 लाख 8 हजार 413 जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले. 2022-23 यावर्षातील 12 महिन्यात 95 हजार 433 जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले. यावर्षी 1 एप्रिल 2023 ते 31 ऑक्टोंबर 2023 या 7 महिन्यांच्या कालावधीतच 82 हजार 896 जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलेे.

महसूल प्रशासनाने जलदपणे काम करत नागरिकांना वेळेत घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज पडत नाही. एका क्लिकवर त्यांना कागदपत्र उपलब्ध झाली आहेत. या कागदपत्रांचा नागरिकांना पुढील शैक्षणिक, नोकरी व वैयक्तीक कामांना फायदा होणार आहे.

– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी