बुलढाणा बुलढाण्याच्या भूमि पुत्राच्या कन्येने यशाच्या आकाशाला गवसणी घातली आहे. सागवन येथील उद्धवसिंग राजपूत यांची कन्या नेहा हिने यूपीएससी परीक्षेमध्ये ५१व्या रँकिंगसह दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. नेहा हिचे संपूर्ण शिक्षण जळगाव येथे झाले आहे. मुंबई येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले आहे. गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त माहितीनुसार डॉ. नेहा यांचे वडील उद्धवसिंग हे जळगाव येथे समाज कल्याण विभागामध्ये नोकरीवर कार्यरत होते. ते आता सेवानिवृत्त आहेत. उद्धवसिंग यांची शेती आणि घर सागवनमध्येच असून डॉ. नेहा राजपूत यशाने त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लवकरच डॉ. नेहा राजपूत यांचा बुलढाणा शहरात सत्कार आयोजित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये यूपीएससीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान यूपीएससीच्या मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला.. यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा २०२३ अंतर्गत आयएएएस, आयपीएस सहित सर्व्हिसेसमध्ये ११४३ पदांची भरती निघाली होती. यामध्ये आयएएसच्या १८० जागा, आयपीएसच्या २०० तर आयएफएसच्या ३७ रिक्त जागा भरण्यात येत आहेत.