अक्कलकुवा : विकासकामे केल्यानंतर त्याचे बिल काढण्याच्या मोबदल्यात २० टक्के लाच म्हणून सहा लाख ४७ हजारांची रक्कम घेताना अक्कलकुवा पंचायत समितीचा ग्रामसेवक मनोज पावरा (दामोदर नगर, तळोदा) व खाजगी पंटर लालसिंग सीमजी वसावे (रा. गमण, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केली. मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी हा सापळा यशस्वी करण्यात आला.
असे आहे लाच प्रकरण
३७ वर्षीय तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी, तालुका अक्कलकुवा येथे सन २०१६ ते २०२० कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीला मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली. नमूद कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल ३२ लाख ३४ हजार ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात आले. नमूद कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात वरील नमूद आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी ३२ लाख ३४ हजार रुपयांच्या वीस टक्के रक्कम म्हणजे ६ लाख ४७ हजार रुपये लाचेची मागणी करीत लाच रक्कम रक्कम पंच व साक्षीदारांसमक्ष स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक समाधान वाघ व पोलिस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, देवराम गावीत, संदीप नावाडेकर, नरेंद्र पाटील, सुभाष पावरा, संदीप खंदारे, हेमंत महाले, जितेंद्र महाले, विजय ठाकरे आर्दीच्या पथकाने ही कारवाई केली.