सात लाखांचे दागिने लांबवणारा भामटा जाळ्यात: चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

चाळीसगाव ः लग्न समारंभात वऱ्हाडींची धावपळ सुरू असताना वधूच्या आईकडील दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लांबवली. या पर्समध्ये नवविवाहितेचे सुमारे सात लाखांचे दागिने होते, मात्र चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकत दागिने हस्तगत केले. बालवीर माखन सिसोदिया (19, रा.गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नजर हटताच लांबवली पर्स
चाळीसगावच्या हॉटेल कलमशांती पॅलेसमध्ये तक्रारदार सरोज मुकुंद देशपांडे यांच्या मुलीचा लग्न समारंभ गुरुवार, 7 रोजी झाला. देशपांडे यांच्याकडे नवरीचे सोन्याचे दागिणे, रोख रुपये व ॲपल कंपनीचा आयफोन होता. हा सर्व ऐवज त्यांनी एका पर्समध्ये ठेवला होता व नातेवाईकांच्या गाठी-भेटी सुरू असताना टेबलावरून अज्ञाताने ही पर्स लांबवली. गुरुवारी रात्री 9.30 वाजता ही घटना घडली. याप्रकरणी त्यांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत सीसीटीव्हीद्वारे संशयित निष्पन्न करीत कोदगाव चौफुलीजवळ त्यास बेड्या ठोकल्या.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, दीपक पाटील, नंदू महाजन, अजय पाटील, राहुल सोनवणे, विनोद खैरनार, रवींद्र बच्छे, आशुतोष सोनवणे, नितीन वाल्हे यांनी ही कारवाई केली.