भारतीय हवामान खात्याकडून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ ‘रेमल’ बाबत महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज रविवारी रात्री उशिरा हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा किनारपट्टीवर धडकू शकते.यादरम्यान बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस शकते, तसेच वाऱ्यांचा ताशी वेग १०० ते १२० किमी प्रतितास असू शकतो, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे रेमल या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही.
रेमल हे मान्सूनच्या आगमनानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे. आयएमडीचे मते, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या चक्रीवादळ ‘रेमाल’चे केंद्र खेपुपारा पासून सुमारे ३६० किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि सागर बेटाच्या ३५० किमी दक्षिण-पूर्वेस आहे.
आयएमडीने सांगितले की, वादळाची तीव्रता आणखी तीव्र होऊन रविवारी सकाळपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. रविवारी मध्यरात्री सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर २६ ते २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय २७-२८ मे रोजी ईशान्य भारतातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.
याशिवाय दक्षिण आणि उत्तर 24 परगणा सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये २६-२७ मे साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोलकाता, हावडा, नादिया आणि पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये 26-27 मे साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर काय परिणाम?
रेमल या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही. पुढील २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढेल. तसेच काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असं भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.