बारामती : राष्ट्रवादीच्या उमेदवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीत जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. प्रत्येक गावात जाऊन त्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. इतकेच नव्हे तर फेसबुकवरूनही भावना व्यक्त करत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात सुनेत्रा पवार यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमधून त्यांनी थेट महाभारताचा दाखला देत शरद पवार गटाला आणि विरोधकांना सवाल केला आहे.
काय आहे पोस्ट?
सारोळ्यात सगळेच एकवटले..! अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर, वेल्हे, मुळशी विधानसभा मतदारसंघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले. सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला.