सुरक्षा यंत्रणांकडून चूक झालीच कशी?

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याला काल २२ वर्षे पूर्ण होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली. कालच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. संसदेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याकडून मोठी चूक झाली. सुदैवाने अनर्थ टळला. parliament-attacked पण, जे काही घडले ते संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. घटना नव्या संसद भवनात घडली. दोन तरुणांनी प्रेक्षकदीर्घेतून सभागृहात उडी मारली आणि लोकसभेत एकच गदारोळ उडाला. अचानक घडलेल्या या घटनेने लोकसभेत बसलेले सदस्यही गोंधळले आणि घाबरलेही. कारण, घटना अनपेक्षित होती. ज्या दोघांनी उडी मारली त्यांच्याकडे शस्त्रे असती तर काय अनर्थ घडला असता, याची कल्पनाही न केलेली बरी ! उडी टाकल्यानंतर एका तरुणाने बुटात लपवून आणलेल्या छोट्याशा स्प्रेमधून पिवळा धूर सभागृहात सोडल्याने सगळेच हादरून गेले होते. या धुरामुळे काही सदस्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता.सदैवाने कुणालाही काहीही झाले नाही आणि शेवटी काही खासदारांनीच त्या युवकांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले, हे बरे झाले. ही बातमी देखील वाचा … कशी असते संसदेची सुरक्षा?

२००१ साली १३ डिसेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात एकूण १४ लोक मारले गेले होते; ज्यात ८ सुुरक्षा रक्षकांचा समावेश होता. त्या घटनेच्या जखमा आजही भळभळत असताना काल त्याच दिवशी घडलेल्या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. आत दोन आणि बाहेर दोन अशा चौघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असली, तरी जी घटना घडली आहे, ती गंभीर आहे.  नव्या संसदेच्या आत लोकसभेत अशी घटना घडल्याने आत जे मार्शल असतात, ते नेमके काय करीत होते, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. ज्या प्रकारे दोघांनी प्रेक्षकदीर्घेतून उड्या मारल्या आणि नंतर खासदार बसतात, त्या बाकड्यांवरून धावत ते पुढे पुुढे जात होते, ते पाहता काहीही घडू शकले असते. देशभरातून मोठ्या संख्येत लोकसभेत आलेल्या खासदारांच्या जिवाला धोका निर्माण होणे काळजी वाढविणारे आहे. संसदेत कुणालाही प्रवेश देताना अतिशय कडक तपासणी केली जाते. पेन, घड्याळ आणि अन्य वस्तू सभागृहात नेता येत नाहीत. मोबाईल फोनही जमा करावा लागतो. चार-पाच ठिकाणी अतिशय बारकाईने तपासणी केल्यानंतरच एखाद्याला प्रेक्षक गॅलरीत प्रवेश दिला जातो. असे असतानाही दोन तरुणांनी गॅस भरलेला स्प्रे कसा काय आत नेला, ही बाब तपासणीत सुुरक्षा रक्षकांच्या लक्षात कशी आली नाही, याचे आश्चर्य वाटते आहे. ही बातमी तुम्ही वाचलीत का … २२ वर्षांनंतर ‘१३ डिसेंबर’ पुन्हा आठवला आणि लोकसभेत जे घडलं… खासदार खौफमध्ये

सभागृहात वरून उड्या मारणाऱ्या दोघांनी जो स्प्रे फवारला, त्यातूून जो पिवळा धूर निघाला त्यात विषारी घटक होता का आणि जर का होता, तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकले असते, याचा आता गांभीर्याने विचार करून संसदेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी लागेल. जे सुरक्षा रक्षक या व्यवस्थेत राहतील ते अधिक चुस्त, सतर्क कसे राहतील, याचीही खबरदारी भविष्यात घ्यावी लागणार आहे. parliament-attacked एका खासदाराच्या पत्रावर या दोन तरुणांनी व्हिजिटर पास घेऊन लोकसभेच्या प्रेक्षकदीर्घेत प्रवेश मिळविला होता, असे जे सांगितले जाते, ते लक्षात घेता यापुढे संसद सदस्यांनाही अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. कुणाला पत्र द्यायचे, कुणाची शिफारस करायची, याचा बारकाईने विचार करावा लागणार आहे. कुणी कुणाचे नाव घेऊन पत्र मागणार असेल आणि अनुचित प्रकार करणार असेल, तर ते लोकप्रतिनिधींच्या जीविताला धोका पोहोचविणारे आहे. या तरुणांनी जे काही केले ते अयोग्य आहे. parliament-attacked त्यांच्या काही मागण्या असतीलही तरी त्यांनी असा प्रकार करायला नको होता. काल मध्यप्रदेश आणि छत्तीसगड अशा दोन राज्यांच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होता, पंतप्रधान आणि अनेक केंद्रीय मंत्री त्यासाठी उपस्थित राहिल्याने संसद भवनात नव्हते, हे बरेच झाले. ही बातमी देखील वाचा … संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी; पोलिसांकडून 4 संशयितांची चौकशी सुरु

पण, पंतप्रधानांसह महत्त्वाचे नेते उपस्थित असते आणि उड्या मारून प्रवेश केलेल्या तरुणांनी शस्त्रास्त्रांनी हल्ला केला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा देत दोघांनी सभागृह सुरू असताना जो धिंगाणा घातला तो सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारा आहे. नव्या संसद भवनात असा प्रकार घडल्याने काळजी वाढली आहे. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. चिंता वाढविणारा आहे. parliament-attacked संसद भवनात ज्या प्रकारचे सुरक्षा स्तर असतात, ते पाहता असा प्रकार घडायलाच नको होता; पण तो घडला. याचा अर्थ असा की, प्रेक्षकदीर्घेत बसलेल्यांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनी कर्तव्यात कुठेतरी कसूर केली. शिवाय, संसद भवनात प्रवेश देत असताना अभ्यागतांची नखशिखांत तपासणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांच्याकडूनही गंभीर चूक झाली आहे. आता यासाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होईलही. पण, कारवाई करून थांबणे पुरेसे ठरणार नाही.भविष्यात पुुन्हा कधीही असा प्रकार घडणार नाही, यादृष्टीने कठोर उपाय योजावे लागतील. १३ डिसेंबर २००१ हा दिवस कधीही विसरता यायचा नाही. संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होते. ही बातमी तुम्ही वाचलीत का … काँग्रेस खासदाराने सभागृहात उडी घेणाऱ्या व्यक्तीला पकडले

महिला आरक्षण विधेयकावरून संसदेत गदारोळ सुरू होता. संसद परिसरात सभागृहाच्या आतपासून ते बाहेरपर्यंत सगळीकडे नेते, पत्रकार बिनदिक्कत फिरत होते, बोलत होते. सगळं काही रोजच्यासारखं सुरू होतं. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी हे आपल्या निवासस्थानाकडे निघाले होते. पण, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह देशाचे अनेक मोठे नेते त्यावेळी संसदेमध्येच उपस्थित होते.त्याचवेळी अचानक अनपेक्षित घटना घडली. अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता. सकाळी ११ वाजून २८ मिनिटे झाली होती. एक पांढरी अ‍ॅम्बेसेडर कार संसद भवन परिसरात गेट क्रमांक १२ मध्ये आली. कारच्या वरती लाल दिवा लावण्यात आला होता आणि समोरच्या काचेवर गृहमंत्रालयाचे स्टीकर लावण्यात आले होते. सर्वसाधारणपणे संसद भवनात आल्यानंतर गाड्यांचा वेग कमी होतो, पण अ‍ॅम्बेसेडर कारचा वेग जास्त होता. त्यामुळे संसद भवनात सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षक जगदीश यादव यांना शंका आली. ही तेव्हाची घटना आहे जेव्हा लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांकडे शस्त्रे नसायची. चार अतिरेकी मात्र एके-४७ घेऊन संसद भवन परिसरात घुसले होते. त्यादिवशी जे घडले ते संपूर्ण देशाने अनुभवले. सुरक्षा रक्षकांनी प्राणांची बाजी लावली नसती आणि अतिरेकी संसदेच्या सभागृहांमध्ये घुसण्यात यशस्वी ठरले असते तर मोठा अनर्थ घडला असता.

पण, कर्तव्य चोख बजावत सुुरक्षा रक्षकांनी लोकप्रतिनिधींचे प्राण वाचवले, हे संपूर्ण देशाने पाहिले. तसेच काही होते की काय, या नुसत्या कल्पनेने काल लोकसभेत बसलेल्या काही सदस्यांच्या पोटात गोळा उठला होता. पण, वेळीच सावध होत उपस्थित सदस्यांपैकी काहींनी सभागृहात उड्या मारणाऱ्या तरुणांना हिमतीने पकडले आणि सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात दिले, हे बरे झाले.सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्यानेच दोन तरुण लोकसभेच्या सभागृहात उड्या मारू शकले, पिवळ्या रंगाचा धूर स्प्रेच्या माध्यमातून पसरवत लोकप्रतिनिधींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकले, हे कुणीही नाकारू शकत नाही. संसदेत जो प्रकार घडला त्याचा परिणाम नागपुरातही जाणवला. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. काल बुधवारी दुपारनंतर अभ्यागतांना प्रवेश पास देणेच विधिमंडळ सचिवालयाने बंद केले. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले गेले; ते योग्य असले तरी दिल्लीत संसद भवनात सुरक्षा व्यवस्थेत असलेल्यांच्या चुकीमुळे इकडे महाराष्ट्रातील विविध शहरांमधून नागपुरात आलेल्यांना त्याचा विनाकारण फटका बसला. यापुढे संसदेत प्रवेश मिळवितानाही सामान्यांना मोठी कसरत करावी लागेल अन् सुरक्षा यंत्रणांवरही प्रचंड ताण असेल, यात शंका नाही.