नंदुरबार : 6 फेब्रुवारीला गुजरातमधून पहिली आस्था स्पेशल रेल्वे अयोध्येला रवाना झाली होती. या गाडीला मेहसाणा रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता गुजरातच्या अन्य स्थानकांवरून अशाच आणखी काही गाड्या लवकरच धावतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते . याच अनुषंगाने रविवारी सुरतहून आस्था स्पेशल रेल्वेलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता .
आस्था स्पेशल रेल्वे हि रविवारी रात्री ८ वाजता सुरतहून अयोध्येसाठी रवाना झाली होती. या गाडीमध्ये एकूण 1340 प्रवासी होते. गाडीमधील प्रवासी जेवण करून भजने गाऊन झोपण्याच्या तयारीत होते. तोपर्यंत रात्रीचे साडेअकरा वाजले होते आणि ही गाडी नंदुरबार स्टेशनच्या दिशेने जात असताना अचानक गाडीवर दगडफेक सुरू झाली. त्यामुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी घाईघाई खिडक्या आणि दरवाजे बंद करण्यास सुरुवात केली. असे असतानाही अनेक दगडे गाडीच्या आत पोहोचले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
अनेक बाजूनी झाली दगडफेक
अनेक बाजूंनी दगडफेक होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दगडफेक करणारे केवळ एक व्यक्ती नसून अनेक जण असल्याचा संशय आहे. माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि काही वेळ चौकशी करून गाडी पुढे पाठवली. याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे जीआरपीने सांगितले.