सुरवातीच्या एका तासात गुंतवणूकदारांचे 10.50 लाख कोटी रुपये हवेत! बाजाराच्या घसरणीचे कारण काय?

STOCK MARKET CRASH: आठवड्यातील पहिल्याच ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या घसरणीमुळे, काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार सकाळी तेजीसह उघडला होता परंतु विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या तीव्र विक्रीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये घसरण दिसून आली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1600 आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 650 अंकांनी घसरला आहे.परदेशी गुंतवणूकदार भारतातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत आणि चीनमध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे गेल्या सहा सत्रांपासून भारतीय बाजारात त्यांची विक्री होत असल्याने बाजारात मोठी घसरण झाली आहे.

सोमवारी 7 ऑक्टोबरच्या सकाळी, उत्कृष्ट जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करत होता. आयटी बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ झाली. पण बाजार उघडल्यानंतर एक तासानंतर विक्री परत आली आणि यातील सर्वाधिक विक्री मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये दिसून आली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 2000 अंकांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक 800 अंकांनी दिवसाच्या उच्चांकावरून घसरला.

गुंतवणूकदारांचे 10.50 लाख कोटी रुपये हवेत
शेअर बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे बाजार भांडवलात मोठी घसरण झाली आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 10.54 लाख कोटी रुपयांनी घसरून 450.35 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 460.89 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 10.53 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भारतीय बाजार का घसरत आहे?
आपल्या अर्थव्यवस्थेला संकटातून सोडवण्यासाठी चीन सरकारने अलीकडेच आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. असा अंदाज आहे की सरकार 1.4 ट्रिलियन डॉलर्सचे आणखी एक मदत पॅकेज जाहीर करू शकते. त्यामुळे चिनी शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून विक्री करून चिनी शेअर बाजारात गुंतवणूक वाढवत आहेत आणि हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय बाजारांमध्ये घसरण होत आहे. त्यामुळे इस्रायल-इराण तणावाचा हि भारतीय शेअर बाजारावर परिणाम होतांना दिसत आहे.