सुरेशदादा जैन ते एकनाथराव खडसे.. पोलीस स्टेशनमधील आंदोलनाची पुनरावृत्ती

 

राज्यातील राजकीय पटलावर जळगाव जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. बरेच दिग्गज नेते जिल्ह्यात झाले… त्यानी एक काळ गाजवला व या पटलावरून ते दूर झाले किंवा त्यांना दूर केले गेले. विविध आंदोलने या नेत्यांनी केली ही आंदोलने राज्यभर चर्चेची ठरली. यात प्रामुख्याने पोलीस स्टेशनमधील राजकीय नेत्यांची आंदोलने चर्चेत राहीली. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दोन ते तीन वेळा पोलीस स्टेशन आवारात आंदोलने केली. प्रारंभी न्यू बी.जे. मार्केटच्या जागेतील त्या काळातील झोपडपट्टी हटावचा मोठा वाद झाला होता. सुरेशदादा त्यावेळी नगराध्यक्ष होते. या ठिकाणी त्यांच्याशी पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर वाद चिघळला व शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. घोषणाबाजीही झाली. मात्र त्याला पोलीस अधिकार्‍यांनी दाद दिली नाही. कालांतराने आंदोलन शांत झाले. त्यानंतर १९९३ मध्ये टपरी हटाव प्रकरणावरून जिल्हापेठ पोलीस स्टेशमध्ये उपोषण झाले. तब्बल पाच ते सहा दिवस हे उपोषण चालले. त्यावेळी त्याच्या सोबत ऍड. रवींद्र भैय्या पाटील, स्व. भिलाभाऊ सोनवणे, बंडूदादा काळे व अन्य काही जण होते. तत्कालीन पालिकेने केलेल्या टपरी हटाव कारवाईला विरोध झाला. यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. सुरेशदादा जैन या आंदोलनात अग्रभागी होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक जोग यांनी मोठी कारवाई करत सुरेशदादा व त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस प्रशासनावर कारवाईची मागणी त्यावेळी झाली होती पण त्यात यश आले नाही. किमान त्या काळातील कॉंग्रेस नेत्यांनी हस्तक्षेप करावा अशी फोनाफोनी झाली पण त्यालाही दाद मिळाली नाही आणि आंदोलन आटोपते घ्यावे लागले. तिच पुनरावृत्ती गुरूवारी झाली.

जिल्हा दूध संघात विद्यमान स्थितीत मंदाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ आहे. संघातील काही अधिकार्‍यांनी केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाईसाठी मंदाताई यांनी बुधवारी लेखी तक्रार दिली मात्र त्यावर कारवाई न झाल्याने आमदार एकनाथराव खडसे, मंदाताई व जिल्हा राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्रभैय्या शहर पोलीस स्टेशनला पोहोचले व आंदोलन सुरू झाले. गुन्हा दाखल करण्यासाठी खडसे रात्रभर कार्यकर्त्यांंसह पोलीस स्टेशनला होते. विशेष म्हणजे सुरेशदादांसोबतच्या आंदोलनात त्यावेळी ऍड. रवींद्रभैय्या पाटील होते व आताच्या खडसेंसोबतच्या आंदोलनातही रवींद्रभैय्या यांचा सहभाग होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या ठिकाणी येऊन उपोषणास पाठींबा दिला व कारवाईची मागणी केली मात्र पोलीस प्रशासनाने दाद दिली नाही. अखेर खडसे यांना उपोेषण तूर्त स्थगित करावे लागले.

जिल्हा दूध संघाची एकेकाळी अक्षरश: वाट लागली होती. थोडक्यात सांगायचे तर त्या काळातील नेत्यांनी संघाला अक्षरश; धुतले. तो बंद पडण्याच्या स्थितीत असताना ‘एनडीडीबी’च्या ताब्यात त्याची सूत्रे गेली व हळू हळू परिस्तिती बदलली. संघ सुस्थितीत आल्यानंतर निवडणूक होऊन तत्कालीन पालकमंत्री असलेल्या खडसेंच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ संघात विराजमान झाले. संचालक मंडळाची मुदत संपली मात्र कोरोना काळ असलेल्याने आहे त्याच संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली. मध्यंतरी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांंच्या नेतृत्वाखाली संघात प्रशासक मंडळ नियुक्त झाले मात्र न्यायालयीन लढाईनंतर पुन्हा खडसेंच्या ताब्यात दूध संघ आला. आमदार चव्हाण यांनी संघातील कामकाजाबाबत काही आक्षेप घेऊन पोलिसात तक्रारीही दिल्या आहे. त्यावरील कारवाईही अपूर्ण आहे. थोडक्यात या सर्व आरोपप्रत्यारोपांच्या लढाईत पोलीस प्रशासन अतिशय सावध पवित्रा घेऊन असल्याचेच लक्षात येते.