जळगाव : भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याने जात असलेल्या दोघांना धडक देत जखमी केले. हे दोघे रामदेववाडी (ता. जळगाव) येथील आहेत. सुसाट कारमुळे याठिकाणी सात दिवसात अपघाताची ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली. घटनेनंतर ग्रामस्थ पुन्हा संतप्त झाले.
हा अपघात सोमवार, १३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रामदेववाडी मारोती मंदिराचे पुढे शिरसोली गावाकडील पाचोरा रस्त्यावर झाला. सदु तेरसिंग राठोड तसेच श्रावण काळ राठोड हे दोघे जण सोयाबीन चिल्ली खाण्यासाठी रामदेववाडी येथून पाचोरा जळगाव रस्त्याने जात होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधील चालक सुसाट वेगाने वाहन आणत होता. वळणावर त्याचे नियंत्रण सुटून दोघांना कारने जोरात धडक दिली.
या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली. दुर्घटनेनंतर जखमीना मदत न करता चालक कार घेऊन वेगाने पळाला. रस्त्याने येणाऱ्या प्रत्यक्षदर्शी तसेच रामदेववाडी येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत दोघा जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. याप्रकरणी तक्रारीनुसार अज्ञात कार चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील करीत आहेत. हे रामदेववाडी येथून मोपेडवरुन महिला मुलांना घेऊन शिरसोली येथे जात होती. भरधाव कारने मोपेडला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही दुसरी घटना घडली.