सेला बोगदा भरवणार चीनला धडकी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

इटानगर : काँग्रेसने सीमावर्ती गावांकडेही दुर्लक्ष केले, या गावांना देशातील शेवटची गावे म्हणत त्यांना फाटा दिला, पण माझ्यासाठी ती गावे पहिली आहेत. आम्ही त्यांना शेवटची गावे नाही, तर पहिले गाव मानले. त्या गावांत व्हायब्रेट ग्राम कार्यक्रम सुरू केला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसचा समाचार घेतला.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अरुणाचलमधील जगातील सर्वांत लांब बोगदा ‘सेला टनेल’ सह अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

धोरणात्मक दृष्ट्या चीनच्या सीमेजवळ असलेला हा बोगदा चीनला धडकी भरवणारा ठरणार आहे. कार्यक्रमात संवाद साधताना पंतप्रधानांनी मोदींच्या गॅरंटीचा अर्थ सांगितला. मोदींची गॅरटी म्हणजे काय, ते तुम्हाला अरुणाचलमध्ये दिसेल. २०१९ मध्ये मी सेला बोगद्याच्या पायाभरणीचे काम सुरू केले. हा बोगदा आज सुरू होत आहे, ही खात्रीशीर हमी म्हणजेच गॅरटी नाही का, असा सवाल त्यांनी केला.

ईशान्य भागाचा चौपट वेगाने विकास आज येथे ५५ हजार कोटी
रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, भारतातील ईशान्य भागात विकासाची कामे चौपट वेगाने सुरू आहेत. विकसित राज्यातून विकसित राज्यापर्यंतचा भारताचा राष्ट्रीय उत्सव देशभरात वेगाने सुरू आहे. आज मला विकसित ईशान्येच्या या उत्सवात ईशान्येतील सर्व राज्यांसह एकत्र सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

सेला बोगद्याचे वैशिष्ट्य
हा बोगदा चीन सीमेच्या अगदी जवळ आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतासाठी खूप महत्त्वाचा.
चीनच्या सीमेला लागून असलेल्या तवांगला सर्व हवामानात मिळाली जोडणी.
इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वांत लांब दोन लेन बोगदा आहे.