जळगाव । इराण-इस्त्राईल संघर्षानंतर आतंरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीने मोठी उडी घेतली आहे. सोन्याच्या दरातील ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. दरम्यान, देशात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरानं सर्व विक्रम मोडले आहेत. जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याच्या किंमतीने ७६ हजारांचा टप्पा ओलांडला. चांदीने देखील मोठी झेप घेली आहे. दोन्ही धातूंच्या दरात झालेल्या दरवाढीने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जळगावात या आठवड्यात सोन्याने ११०० रुपयांची उसळी घेतली. दुसरीकडे चांदीत काही बदल दिसून आला नाहीय. गेल्या रविवारी २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७३००० हजार रुपयावर होता. सध्या आता २२ कॅरेट सोने ६६,८७० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७४,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. ३ टक्के जीएसटीसह सोन्याचा दर ७६,३२० रुपयापर्यंत गेला आहे. सोबतच चांदी एक किलोचा दर विनाजीएसटी ८४००० रुपयावर आहे.
दरवाढीचे हे आहेत कारण
सध्या इराण-इस्राईलच्या युद्धामुळं जगभरातील वातावरण तणावात आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत आहे. कारण सुरक्षीत गुंतवणूक म्हणून सोन्याकडं बघितलं जाते. त्यामुळं मोठ्या बँका सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. याचा परिणाम दरावर होत असल्याचे दिसत आहे. तसेच जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे सोन्याच्या दरातही वाढ होतेय.